TOD Marathi

मुंबई:

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असं म्हणणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांचा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला. (Amol Kolhe on Prasad Lad’s statement) लाड यांना चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, अशी उपहासात्मक टीका करतानाच हसावे की रडावे या पलिकडील उद्विग्नता आहे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला.

भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद घेतली. (Prasad Lad says Shivaji Maharaj born in Kokan) यावेळी या महोत्सवाची माहिती देताना त्यांनी शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचं विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असं विधान केलं.

अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया काय?

काय ते अगाध ज्ञान! इतिहासाला कोड्यात टाकणारा हा इतिहास! वा गुरूजी, जन्म कोकणातील, स्वराज्याची शपथ रायगडावर, बालपण रायगडावर! अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, असे बोचरे वार अमोल कोल्हे यांनी प्रसाद लाड यांच्यावर केले.

हसावे की रडावे या पलीकडील उद्विग्नता आहे. खरं तर लाड यांच्या विधानाचा निषेध किंवा धिक्कार करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. आपल्याला पुन्हा इतिहास रूजवावा लागणार, जागवावा लागणार आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.

अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया काय? 

दररोजची सकाळ उगवते ती वाचाळवीर नेत्यांकडून शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांनी… ज्यांना कसलाही इतिहास माहिती नाही, जे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत, त्यांच्याकडून अशा वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरु आहे. पहिल्यांदा कोश्यारी, नंतर भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी, नंतर मंगलप्रभात लोढा, आणि आता प्रसाद लाड.. यांच्याकडून ठरवून अशी विधाने होतायेत, अशा वाचाळवीरांना आवरलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.