TOD Marathi

टिओडी मराठी, सांगली, दि. 27 जुलै 2021 – 2019 नंतर पुन्हा यंदा पावसाळ्यात सांगली – कोल्हापूरला महापुराचा फटका आहे. अजूनही काही ठिकाणी पुराचे पाणी ओसरलेले नाही. या भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौरा करून पूरग्रस्त ठिकाणाची पाहणी केली. त्यामुळे हा महापूर कोणत्या बाबीमुळे आला असेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अलमट्टी धरणामुळे सांगली – कोल्हापूरला महापुराचा फटका बसला आहे, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, अलमट्टी धरणाचा ‘इथल्या’ महापुराशी संबंध नाही, असे सांगितले आहे. तसेच पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून मदत केली जाईल, असेही त्यानी सांगितले.

पवार म्हणाले, शंभर वर्षांत झाला नाही इतका पाऊस एकावेळी कोयना, नवजा परिसरामध्ये झाला आहे. या विक्रमी पावसाची जबर किंमत आपल्याला मोजावी लागली आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांसह सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कमी पडणार नाही, असा विश्वासही अजित पवार यांनी पूरग्रस्तांच्या भेटीदरम्यान दिला.

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री पवार सोमवारी घेतला. यावेळी पवार म्हणाले, पाण्याचा विसर्ग आणि त्याचा फुगवटा होणार नाही, यासाठी जलसंपदा विभागाकडून प्रयत्न होत होते.

अगदी अलमट्टीमधून विसर्गावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाने एका अधिकाऱ्याची नियुक्ती केलीय. व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्यास त्यांच्या पुनर्वसनासाठी शासन प्रयत्नशील आहे. पुराचा फटका बसलेल्या संपूर्ण भागाचा आढावा घेतल्यानंतर दोन दिवसांत मदतीबाबत घोषणा केली जाईल.

अजित पवारांनी जिल्ह्यामध्ये सोमवारी दुपारी सुरुवातीला पलूस तालुक्यातील माळवाडीत पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच निवारा केंद्रातील नागरिकांशी संवाद साधला.

भिलवडीमध्ये पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी मिरज तालुक्यातील कवलापूर इथे निवारा केंद्रास तसेच सांगलीतील पूरग्रस्त भागास, पूरग्रस्त निवारा केंद्रास भेट दिली आहे.

चक्रीवादळाचा फटका बसला तेव्हा अडीचपट जादाची मदत केली. तशीच मदत आताही पूरग्रस्तांना केली जाईल. राज्य सरकार जबाबदारी घेईल; पण केंद्र सरकारनेही जबाबदारी घ्यावी, असे पवार म्हणाले.

कोल्हापुरातील महापुराचा विळखा सैल झाला आहे. मदतकार्याला वेग आलाय. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू केली आहे. पाऊस थांबल्याने पूर ओसरेल, तसे घराघरात, दुकानात स्वच्छतेची कामेही युद्धपातळीवर सुरु झाली आहेत.