
पुणे: वाडेश्वर कट्ट्याने गेली अनेक वर्षे जपलेली संवादाची परंपरा यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवता आली. इतर वेळेस राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत बसणारे राजकीय नेते दिवाळीच्या निमित्ताने मात्र एकमेकांचे तोंड गोड करत आहेत आणि ही परंपरा गेली अनेक वर्षे पुण्याच्या वाडेश्वर कट्ट्याने जपली आहे.
निवडणूका येतात- जातात. मतभेद असावेत, मनभेद नसावेत, असा या दिवाळी फराळ मागचा उद्देश आहे. अंकुश आण्णा व त्यांच्या टीमच्या वतीनं वाडेश्वर कट्ट्यावर दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं. या दिवाळी फराळाच्या निमित्ताने, मागील राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येवून, चांगल्या भावनेनं राजकारण करु, असं मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय गप्पांचा फड रंगतो तेंव्हा…
वाडेश्वर कट्ट्यावर आज राजकीय फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या कट्ट्यात सहभागी होऊन मनमुराद गप्पा आणि फराळाचा आनंद लुटला. राजकीय चौकटीपलीकडे मित्रत्वाचे नाते जपण्याची आपल्या पुण्याची राजकीय संस्कृती राहिलेली आहे. pic.twitter.com/Dk74B9mmFO
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 3, 2021
एकमेंकावरील आरोप हे शहराच्या विकासासाठी असतात त्यात कोणत्याही प्रकारचा मन भेद नसतो, अशी भावना माजी महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. विचारांची लढाई विचारांनीच लढली जाते असा एक संदेश देखील या सर्वपक्षीय दिवाळी फराळाच्या कार्यक्रमातून दिसून आला.