एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची (Eknath Shinde CM) शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून पहिला वार आज केला आहे. भाजप एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. पुन्हा एकदा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असे सांगितले जात आहे. पण हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला (Shivsena) बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री असू शकत नाही, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना भवनात हजेरी लावली. यावेळी पत्रकारपरिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली.
शिवसेना आणि भाजप २०१९ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढले होते. मग तेव्हा हेच ठरलं होतं, तर मध्ये तुम्ही मला मुख्यमंत्री कशाला बनायला लावलं? आता भाजपसोबत गेलेल्यांनी हा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी ज्यांना शब्द मोडला, आपल्या पाठीत वार केला, हे आता भाजपसोबत गेलेल्यांनी लक्षात घ्यायला हवे, असे उद्धव ठाकर यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिशेने होता. आता यावर ते काही प्रतिक्रिया देतात का, हे पाहावे लागेल.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये इथून पुढे मी शिवसेना भवनात बसणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात आले. यावेळी त्यांचा चेहरा हसतमुख होता. त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात पत्रकारांशी संवाद साधायला सुरुवात केली. यावेळी शिवसैनिक घोषणबाजी करत होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी, ‘मला वाटलं पत्रकार घोषणा देतायत’, अशी शाब्दिक कोटीही केली.