संजय राऊतांना आमच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे वक्तव्य शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केलंय. (Deepak Kesarkar on Sanjay Raut) संजय राऊत यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान केलं, ही आमची चूक झाली. त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असेही ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे आज असते तर संजय राऊतांना बाहेर काढलं असतं आणि बाळासाहेब असते तर भाजपसोबतची युती तुटली नसती असेही केसरकर म्हणाले.
आमच्या बाजूने बहुमत आहे. अंतिम विजय हा सत्याचा होणार आहे. आम्हाला कोर्टात न्याय मिळेल असेही दीपक केसरकर म्हणाले. आमच्या पार्टीचं अस्तित्व कायम आहे आणि एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत असेही ते म्हणाले. (Eknath Shinde is our leader, says Deepak Kesarkar) विधानसभेच्या उपसभापतींनी चुकीचे निर्णय दिले आहेत. 55 पैकी 14 ते 15 लोक घेऊन तुम्ही पक्षाच्या नेत्याला काढू शकत नसल्याचे केसरकर म्हणाले. आपले सहकारी मंत्री जर इतर ठिकाणी गेले तर राज्याचा कारभार सुरळीत चालवणे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे. त्यांनी गुवाहाटीला गेल्याल्या मंत्र्यांची खाती इतर मंत्र्यांकडे देऊन त्यांचे कर्तव्य पार पाडल्याचे केसरकर म्हणाले.
संजय राऊत आधी टीका करतात आणि परत सावरण्याचा प्रयत्न करतात. आधी ते एकनाथ शिंदे यांना काढून टाका म्हणत होते, त्यानंतर ते त्यांची समजूत काढायला मिलिंद नार्वेकरांना पाठवलं. त्यांचे नेहमी असेच असते, त्यांचे नेहमी टायमिंग चुकते असेही केसरकर म्हणाले. संजय राऊतांनी आमच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली आहे. तुमच्याकडे थोडीशी जरी नितीमत्ता असेल तर तुम्ही त्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मतदान घेऊन निवडून या असा टोलाही केसरकर यांनी लगावला. आमची मत घेऊन आमच्याबद्दल असे चुकीचे बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नसल्याचे ते म्हणाले. संजय राऊतांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही दुसऱ्यांना विनंती करु की त्यांच्याविरोधात कोणीही निवडणूक लढवू नका यांना बिवनिरोध करा. त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जावं असेही केसरकर म्हणाले.
संजय राऊत हे 50 टक्के राष्ट्रवादीचे आणि 50 टक्के शिवसेनेचे असल्याचेही केसरकर म्हणाले. त्यांच्यासारखा प्रवक्ता कोणत्याही पक्षाला लाभू नये अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो असेही ते म्हणाले. संजय राऊतांनी गुवाहाटीला येऊ नये अशीच माझी ईच्छा आहे. मी कसबस आमदारांना रोखून धरलं आहे. त्यांना काही बोलू नका म्हणून विनंती केल्याचे केसरकर म्हणाले. टीका केल्यावर कोणाही गप्प बसणार नाही, आम्ही शिवसैनिक आहेत असेही केसरकर म्हणाले.