हार्दिक पटेल ट्विट करत म्हणाले, “…एक लहान सैनिक म्हणून काम करेन”
२०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचे विरोधक असलेले आणि पाटीदार आंदोलनाचा चेहरा राहिलेले हार्दिक पटेल आज भाजपात प्रवेश करत आहेत. गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेल यांनी सकाळी एक ट्विट करत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या कार्यात एक छोटा शिपाई होऊन काम करणार असल्याचं म्हटलं आहे.
हार्दिक पटेलचं ट्वीट काय ?
राष्ट्रहित, प्रदेशहित, जनहित आणि समाज हित या भावनांसह आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या देशसेवेच्या कार्यात मी लहान सैनिक म्हणून काम करेन.
राष्ट्रहित, प्रदेशहित, जनहित एवं समाज हित की भावनाओं के साथ आज से नए अध्याय का प्रारंभ करने जा रहा हूँ। भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र भाई मोदी जी के नेतृत्व में चल रहे राष्ट्र सेवा के भगीरथ कार्य में छोटा सा सिपाही बनकर काम करूँगा।
— Hardik Patel (@HardikPatel_) June 2, 2022
काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर हार्दिक पटेल यांनी काँग्रेस नेतृत्व आणि पक्षाची काम करण्याची पद्धत यावर जोरदार टीका केली होती. मी काँग्रेसमध्ये तीन वर्षे वाया घालवली, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली होती.
हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात प्रदेश काँग्रेस नेत्यांबरोबरच शीर्ष नेतृत्वालाही लक्ष्य केलं होतं. ‘‘गुजरात आणि गुजराती लोकांबद्दल द्वेष असल्यासारखे पक्षाच्या नेतृत्वाचे वर्तन होते. मी अनेकदा गुजरातमधील समस्यांकडे नेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र, जेव्हा-जेव्हा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून काही मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाइलवर अधिक लक्ष असल्याचे आढळले, काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे गांभीर्याचा अभाव असल्याचे दिसले’’, अशी टीका केली होती. देशाला किंवा पक्षाला गरज असताना काही नेते परदेशात मौजमजा करत होते, अशी टिप्पणीही हार्दिक यांनी या पत्रात केली होती.
काँग्रेसला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला मात्र, काँग्रेस केवळ विरोधाच्या राजकारणात अडकला असून, देश आणि समाजहिताविरोधात काम करत आहे, असा आरोपही हार्दिक पटेल यांनी केला होता.