राज्याची लाइफलाइन अशी ओळख असलेले लाल परी आता नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल होतेय. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रीक बस ‘शिवाई’ प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या स्थापना दिनाच्या दिवशी शिवाई बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. एसटी महामंडळातील पहिली एसटी इलेक्ट्रीक बस पुणे-अहमदनगर दरम्यान धावणार आहे.
आज राज्याच्या विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, एसटी मंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आज लोकापर्ण सोहळा पार पडला. या लोकार्पण सोहळ्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, राज्यात 1932 मध्ये खासगी सेवा सुरू झाली होती. त्यानंतर एक जून 1948 मध्ये एसटी महामंडळाची बस धावली. परदेशांमधील बसेस प्रमाणे ही नवीन बस असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुद्धा झाला नंतर त्याला मार्ग मिळाला. पण आता याला कोणाची दृष्ट लागू देऊ नका असे आवाहनही अजित पवार यांनी केले. राज्यात टप्प्याटप्प्याने शिवाई बसेस सुरू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले.