राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या काकांचे सोमवारी निधन झाले त्यांचा अंत्यविधी वेळी घडलेला एक प्रसंग रूपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे यावेळी त्यांनी केलेल्या कृतीचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. स्त्रियांच्या बाबतीत समाजात अनेक वर्षांपासून चालत आलेल्या अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्यासाठी केवळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात तशी कृती करणं आवश्यक असतं असाच संदेश रूपाली चाकणकर यांच्या या पोस्ट मधून दिसून येतो.
रूपाली चाकणकर यांचे काका गेल्यानंतर अंत्यविधी वेळी रुपाली चाकणकर यांच्या काकूच्या गळ्यातील मंगळसूत्र काढत होते, त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी त्यांना थांबवलं. आधीच पतीच्या निधनामुळे दुःखात असलेल्या पत्नीला आणखी किती त्रास होतो असं म्हणत या विधीमध्ये बदल करण्याचे सांगितले. कुटुंबीयांसह ग्रामस्थांनीही या गोष्टीला तात्काळ होकार दिला. रुपाली चाकणकर यांनी केलेली ही कृती कौतुकास्पद असून त्याची चर्चा आता सगळीकडे होत आहे.
काय आहे रुपाली चाकणकरांची पोस्ट ?
काल पंढरपुर दौरा करुन पुण्याकडे निघताना बंधुचा फोन आला, रात्रीचे ११ः३० वाजले असतील, अस्वस्थ होत मला निरोप दिला, काका अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेले आहेत, आता हाॅस्पिटलला आम्ही सगळे आलो आहोत, तु पोहचण्याचा प्रयत्न कर. हि दुःखद बातमी ऐकुन मला धक्काच बसला.
लहानपणापासुनचा एकत्र कुटुंबातील जीवनप्रवास डोळ्यासमोरुन सरकु लागला,फार मोठ्या एकत्र कुटुंबात वाढले,एकुण सात काका,एक आत्या,सात भाऊ,बारा बहिणी या सर्वांचे एकत्र कुटुंब,हे माझे काका सहा नंबरचे. जेव्हापासून हे जग समजतं तेव्हापासुन त्यांना सैनिकी वेषात पाहिलेले, सैनिक म्हणुन देशसेवा करीत असताना ,गावाला ,कुटुंबाला फार मोठा अभिमान….
ते सुट्टीत घरी आल्यानंतर परत जाताना आजीपासुन ते सगळ्या काकु रडत सामान ,प्रवासाची ,सोबतच्या जेवणाची तयारी करत, माहेराहुन पाठवणी असत तसा तो निरोपचा कार्यक्रम होत,त्यावेळी ते समजत नव्हतं पण मोठं होताना त्यातील प्रेमाची ओढ जाणवत गेली.
माझ्या आईसोबतचा हा फोटो ,मोठी वहिनी कमी आणि बहिण म्हणुन या सगळ्यांनी लहान दिरांना सांभाळले ,आज दोघेही नाहीत ,आहेत त्या फक्त आठवणी..
आज अंत्यविधीच्या वेळी या लहाणपणाच्या या सगळ्या आठवणी फेर धरत होत्या,अंत्यविधी सुरु होताना कोणीतरी आवाज दिला ,तोंडात मणी द्यायचा आहे ,मंगळसुत्र काढा …उठून पुढे गेले आणि सगळ्यांना सांगितलं काकूचे मंगळसुत्र कोणीही काढायचा प्रयत्न करु नका,त्याऐवजी तुळशीचे पान तोंडात द्या.आता विधी करताना आपण बदल करायचा,तात्काळ ग्रामस्थ व कुटुंबियांनी मान्य केलं.कुंकु न पुसतां.जोडवी न काढतां ,बांगड्या न काढता अंत्यविधी झाला.
आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याचे अपार दुःख व मानसिक धक्का असताना ,पतीच्या अंत्यविधीत पत्नीला मिळणारी वागणुक जास्त वेदनादायक असते ,विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत…या सामाजिक क्रांतीच्या विचारात एक पाऊल पुढे टाकताना आपणही सर्वजण सहभागी होऊ या…….नव्या उषःकालासाठी