TOD Marathi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पुण्यात 22 मे ला पार पडली. या सभेत “माझ्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली” असं वक्तव्य केलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या अयोध्दा दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत दिसत आहेत.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार ब्रजभूषण सिंग हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. मनसे पदाधिकारी सचिन मोरे यांनी शेअर केलेला फोटो एका कुस्ती स्पर्धेतील असल्याचे दिसत आहे.

 

सचिन मोरे यांच्यानंतर आता संदीप देशपांडे यांनीही बृजभूषण सिंह यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर करत निशाणा साधला आहे.

संदीप देशपांडे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांविरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे.”

 

सोशल मीडियावर अनेकांनी या फोटो शेअर करत वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून आगामी काळात राजकारण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.