नांदेड:
मे महिन्यात राज्यभरात सर्वत्र उन्हाचा तडाखा प्रचंड वाढत असताना काल नांदेडमध्ये मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना या मान्सून पूर्व पावसाने चांगलेच झोडपले आहे. गुरूवारी सकाळी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.
यंदा तापमानाने उचांक गाठत तापमान ४४ अंशापर्यंत जाऊन पोहोचले होते. उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. काल सकाळी पडलेल्या पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. मान्सून पूर्व पडलेल्या या पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाला आता वेग येणार आहे.
येत्या चार ते पाच दिवसांमध्येही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये वातावरण कोरडे असले तरी अंशतः ढगाळ असेल, असा अंदाज आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये गुरुवारी हलक्या सरी किंवा मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. रायगडमध्ये पावसाचा जोर शुक्रवारी कमी असेल तर रत्नागिरीमध्ये शनिवारी हा जोर कमी होईल. कोकणात सिंधुदुर्गमध्ये शनिवारी आणि रविवारी मेघगर्जना किंवा हलक्या सरींची शक्यता आहे.