तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरात माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंना अडवल्याचे प्रकरण आता चांगलेच तापताना दिसत आहे. या सर्व प्रकरणानंतर सकल मराठा समाजातर्फे आज तुळजापूर बंदची हाक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकल मराठा समाज आणि तुळजापूरकरांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. संभाजीराजेंना मंदीराच्या गाभाऱ्यात अडवल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. काल सकाळी घडलेल्या या घटनेनंतर जिल्हाधिकारी, मंदीर समिती, व्यवस्थापक यांच्यावर आता कारवाई करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीराजे भोसले मंगळवारी तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना पुरातत्व विभागाने जारी केलेला नियम सांगत प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर मंदिर प्रशासनाने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करत एक पत्रकही जारी केले. मात्र, त्यानंतरही हा वाद काही शांत होताना दिसत नसून, आज सकल मराठा समाज आणि तुळजापूरकरांच्या पार पडलेल्या बैठकीत उद्या तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
तुळजाभवानी मंदिर आणि संभाजीराजेंच्या घराण्याचे अगदी सुरुवातीपासुन विशेष नाते राहिले आहे. मात्र नियम सांगत छत्रपती संभाजीराजेंना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर अनेक स्तरातून या घटनेचा निषेधही व्यक्त करण्यात आला.
मंदिर गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्यामुळे संभाजीराजेंचा अपमान झाल्याचा दावा मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आला असून, त्यांच्याकडून मंदिर व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. सकाळी गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्यानंतर तात्काळ संभाजीराजे छत्रपती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला आणि त्यांना खडे बोल सुनावले होते.