नवी दिल्ली : संतुरवादनाला जगभरात प्रतिष्ठा मिळवून देणारे संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जगभरात संतुरवादनानं श्रोत्यांना स्वरानंद देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचा चाहतावर्ग मोठा होता.
अतिशय संघर्षमय परिस्थितीतून त्यांनी वाट काढत आपली स्वताची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीत विश्वाला मोठा हादरा बसला असून त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवकुमार शर्मा हे किडनीच्या आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर एका रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. मात्र त्यादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरव्दारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, आज आपल्या देशाच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी झाली आहे. आपण पंडित शिवकुमार शर्मा यांना गमावले आहे. त्यांच्या जाण्यानं तीव्र वेदना झाल्या आहेत. संतुरवादनानं ते जगभर ओळखले गेले. त्यांना त्या वाद्यानं वेगळी ओळख निर्माण करुन दिली.
भारतीय संगीत विश्वात भरीव कामगिरी करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती, त्यांच्या संगीतरचना या नव्या पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहेत. त्यांचे कर्तृत्व कधीही विसरता येणार नाही. मी त्यांच्या कुटूंबियाप्रती सहानुभूती व्यक्त करतो, असं मोदींनी म्हटलं आहे.