कोल्हापूर: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. आज छत्रपती शाहू महाराजांची 100 वी पुण्यतिथी आहे. आणि याच निमित्ताने कोल्हापूरात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे.
यावेळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांना कृतज्ञता वाहण्यासाठी 100 सेकंद स्तब्ध आणि मौन राहत कोल्हापूरकरांनी शाहू महाराजांना अनोखी मानवंदना दिली. 18 एप्रिल ते 22 मे दरम्यान आयोजन करण्यात आलेल्या या उत्सवाचा मुख्य सोहळा आज होत आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना देताना अख्खं कोल्हापूर स्तब्ध झाल्याचं झालं होतं. राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी राज्यातील महत्वाच्या नेत्यांसोबतच कोल्हापूरची जनताही हजर होती. कोल्हापूरातील नागरिक विविध चौका-चौकात एकत्र आले आणि 100 सेकंद स्तब्ध राहिले. काहींनी आहे तिथूनच महाराजांना मानवंदना दिली.
गजबलेलं कोल्हापूर 100 सेकंदांसाठी स्तब्ध होतानाचं दृष्य ऐतिहासिक तर होतंच मात्र तेवढंच भावनिकही होतं. 22 मेपर्यंत हे कृतज्ञता पर्व सुरु राहणार असून यामध्ये युवा पिढीसाठी अनेक स्पर्धा, उपक्रम, प्रदर्शन, 100 व्याख्यानं, सायकल फेरी, कोल्हापूरातील ऐतिहासिक वास्तूंच्या निवडक रेखाचित्रांचं प्रदर्शन भरवलं जाणार आहे.
100 सेकंद स्तब्धता पाळून लोकराजाला आदरांजली वाहिल्यानंतर चित्ररथ मिरवणूकही कोल्हापुरात काढण्यात आली. नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठीही काही उपक्रम, परिषदा घेण्यात येणार असून निसर्ग पर्यटन, धरण परिसर भ्रमंती असे अनेक कार्यक्रम या निमित्तानं होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांसाठी कोल्हापूरकरांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.