नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशात जाणाऱ्या आणि येणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं नवी नियमावली तयार केली आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी याबाबत आदेश जारी केला असून परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना नव्या नियमावलीनुसार दिलासा मिळणार आहे. मंत्रालयानं ७ दिवसांच्या होम क्वारंटाइनमधून प्रवाशांना सूट देऊन, या प्रवाशांना १४ दिवस स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
कोरोनाच्या परिस्थितीत सुधार आल्यानं केंद्रीय मंत्रालयानं परदेशातून येणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. नवी नियमावली १४ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. या नियमावलीनुसार, आता जोखीम श्रेणीतील देश आणि अन्य देश यात कुठलाही फरक नसणार आहे. नव्या नियमावलीनुसार, जो कुणाला परदेशातून भारतात यायचं असेल त्यांनी केंद्राने सांगितलेल्या सुविधा पोर्टलवर आपल्या मागील १४ दिवसांच्या प्रवासाची माहिती भरून द्यायची आहे. (https://www.newdelhiairport.in/airsuvidha/apho-registration) या पोर्टलवर संबंधित माहिती आपण भरू शकता
केंद्राने ठरवून दिलेली नवीन नियमावली खालीलप्रमाणे-
– परदेशी प्रवाशांनी ७२ तासांपूर्वी आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह किंवा पूर्ण लसीकरण झालेले प्रमाणपत्र एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.
– संबंधित एअरलाइन्स आणि ट्रॅव्हल एजन्सीने प्रवाशांना तिकीट देण्यापूर्वी देशातील कोरोना प्रोटोकॉल माहिती आणि संबंधित नियमांबाबत माहिती द्यावी.
– एसिम्टोमॅटिक असलेल्या प्रवाशांनाच विमानात प्रवास करण्यास प्रवेश द्यावा. सोबतच त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू एप डाऊनलोड असणे गरजेचे आहे
– उड्डाणावेळी विमानात होणाऱ्या उद्घोषणेत कोविड १९ पासून सुरक्षित राहणाऱ्या सूचनांची माहिती द्यावी लागेल.
– कुठल्याही प्रवाशाला कोविड लक्षणं आढळली तर त्याबाबत योग्य ती तक्रार करुन प्रोटोकॉलनुसार संबंधित प्रवाशाला आयसोलेट करतील, तसेच विमान पायलट आणि क्रू मेंबर्स कोविड नियमांचे पालन करतील.