राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे आता एका नवीन वादात अडकले आहेत. अभिनेते अमोल कोल्हे नथुराम गोडसेंची भूमिका साकारणार आहेत. याबाबत नुकतीच त्यांनी सोशल मिडीयावर माहिती दिली होती. व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात असलेली त्यांची ही भूमिका आता वादात सापडण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी डॉ.कोल्हे यांचा तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क असल्याची भूमिका मांडली आहे.
यावर अमोल कोल्हे यांचे स्पष्टीकरण!
यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. या सिनेमाचे शूटिंग आपण राजकारणात प्रवेश करण्याआधी झाले होते, असे त्यांनी म्हटले आहे. २०१७ मध्ये या सिनेमाचे शूटिंग झाले होते. त्यावेळी आपण राजकारणात सक्रीय नव्हतो. काहीवेळा एखाद्या विचारसरणीशी आपण सहमत असतो तर काहीवेळा विचारसरणीशी सहमत नसलो तरी कलाकार म्हणून ती भूमिका करतो. तसेच एखादी पात्र साकारतो म्हणजे आपण त्या विचारधारेशी सहमत असतो असे नाही, अशी भूमिका अमोल कोल्हे यांनी मांडली आहे. आपण वैयक्तिक आयुष्यात तसेच सार्वजनिकरित्या देखील नथुराम गोडसेचे समर्थन केलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एक कलाकार म्हणून आपल्याला ती भूमिका करणार का असे विचारण्यात आले आणि आपण ती भूमिका केली, असे त्यांनी म्हटले आहे. आपली विचारधार वेगळी आहे, असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या पक्षातील नेतेही याबाबत टीका करु शकतात, पण त्याचे मला वाईट वाटणार नाही, कारण माझी राजकीय विचारसरणी वेगळी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पक्षाच्या वरीष्ठांना आपण याबाबत कल्पना दिलेली आहे, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.