मुंबई : भाजप आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद निर्माण झाला आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे नाना पटोले चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांकडून पटोलेंच्या अटकेची मागणी केली जात होती मात्र आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाना पटोले यांना अटक करा, अशी मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत नाना पटोले यांच्या अटकेची मागणी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये नितीन गडकरी यांनी म्हटलं, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पटोलेंवर गन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मी काहीही बोललो नाही, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिल आहे. भाजप विरोधात नाना पटोले आधीपासूनच आक्रमक आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नाना पटोले हे मोदींन बद्दल मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा वापरल्याचा दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत पटोलेंच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून पटोलेंविरोधात अटकेच्या मागणीने जोर धरला आहे.
भंडारा जिल्हा परिषदेची दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक आज, मंगळवारी पार पडत आहे. त्यानिमित्ताने 16 जानेवारीला प्रचाराच्या अखेरच्या दिवशी लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील सभेत पटोले यांनी ‘मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.