मुंबई: गेल्या बऱ्याच काळापासून गायब असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात आली. त्यांची चौकशी जवळपास १२ तासांपेक्षा अधिक तास करण्यात आली आणि अखेर त्यांना अटक करण्यात आली. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावाचं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत एक ट्वीट केलं आहे, मा. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी म्हणलं होतं.
सचिन वाझे यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले, मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला नोकरीवरुन काढण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या आरोपावर माझी चौकशी केली जातेय. माझ्या परिवाराला त्रास दिला जातोय. त्याबद्दल मला अतिशय दु:ख आहे, असंही देशमुख म्हणाले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.