मुंबई: राज्यभरातील सर्व शाळा सोमवारपासून (४ ऑक्टोबर) पुन्हा सुरु झाल्या आहेत. यावरून आता विरोधकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. उठा उठा शाळा चालू झाली आता मंत्रालयात जायची वेळ झाली, अशी टीका त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमीच घराच्या बाहेर पडत नसल्यावरून टीका होत आली आहे. याची अनेकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठराखण केली आहे. मात्र विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या या टीकांना उत्तर देताना ठाकरे म्हणायचे, घरात बसून एवढं काम होतंय, तर विचार करा बाहेर पडलो तर किती काम होईल.
उठा,उठा शाळा चालू झाली आता मंत्रालयात सुद्धा जायची वेळ झाली.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 6, 2021
या आधी देखील अनेक वेळा करोना काळात मंत्रालयात न जाता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे सातत्याने भाजपा आणि मनसेने बोचऱ्या टीका केल्या आहेत. त्यात आता संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.