चंदीगड: शेतकऱ्यांमध्ये तीन कृषी कायद्यांमुळे संताप असतानाच हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा समजते. हातात एक हजार काठ्या घ्या. शेतकऱ्यांचा बंदोबस्त करा. त्यांना जशास तसे उत्तर द्या, असं विधानच मनोहरलाल खट्टर यांनी केलं आहे. त्यामुळे देशभरातील प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर चंदीगड येथे शेतकऱ्यांच्या एका कार्यक्रमाला आले होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. आपल्या परिसरातील एक हजार लोकांनी काठ्या हातात घेऊन शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी जावं आणि शेतकऱ्यांचा बंदोबस्त करावा, असं खट्टर म्हणाले. खट्टर एवढंच बोलून थांबले नाहीत तर शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर द्या. फार काय दोन तीन महिने तुरुंगात राहाल तर मोठे नेते व्हाल. जामिनाची काही चिंता करू नका, असंही ते यावेळी म्हणाले.
खट्टर यांच्या या विधानावर संयुक्त किसान मोर्चाने संताप व्यक्त केला आहे. तसेच खट्टर यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणीही किसान मोर्चाने केली आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानाने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.