लखीमपूर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात ही घटना घडली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते. मौर्य यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या कृषी कायदेविरोधी शेतकरी आंदोलकांवर दोन मोटारी घुसवल्यानंतर हा हिंसाचार घडला.
केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या बनवीरपूर या मूळ गावात काही विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार होते. तेव्हा तिथे शेतकरी आंदोलक काळे झेंडे घेऊन निदर्शने करत होती, त्यांची समजूत घालूनही शेतकरी तिथून उठायला तयार नव्हते. त्यातच भाजप नेत्यांच्या गाड्यांमधील दोन एसयूव्ही या जमावयांच्या आंगवर घातल्या आणि या हिंसाचारात चार शेतकरी आणि अन्य चार जण ठार झाल्याचे लखीमपूर खेरीचे जिल्हाधिकारी अरविंद कुमार चौरासिया यांनी सांगितले.
लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ आज, सोमवारी देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येतील, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली. या घटनेची उत्तर प्रदेश प्रशासनाकडून नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. काँग्रेसनेही या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.