नाशिक: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. आता नाशिक शहराला महापुराचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून आज १५ हजार क्युसेकपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरातील नदी जवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
नाशिक शहरातील रामसेतू ब्रिजपर्यंत पाणी वाढलं आहे. त्यामुळे सराफ बाजारही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली आहे. दुकानं हटवण्याची धावपळ सुरू आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.