पुणे: पुण्यात मिरवणुकीला परवानगी नव्हती मात्र तरीही पुण्यात तुळशीबाग मंडळाने ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलीसांनी हस्तक्षेप करत ढोल ताशा बंद केले. कार्यकर्त्यांनी पोलिसांना ५० लोकांना परवानगी दिल्याचं सांगत ढोल ताशा वाजवू देण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी वादकांना पोलीसी खाक्या दाखवत ढोल ताशा बंद केले आणि ढोल ताशे जप्त केले.
ढोल ताशे बंद करण्यात आले मात्र तरीही मंडळातील तरुण मंडळी हातांच्या टाळ्यावर ताल देत नाचत होती. तरुण मंडळी ऐकणार नाही असे लक्षात आल्यावर पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आणि अवघ्या १० मिनीटात गणपती बाप्पाचं विसर्जन गजकुंडात करण्यात आलं. सध्या कोविडच्या संकटमुळे आणि त्यात आणखी काही रुग्णांची वाढ पुण्यात झाल्याने संचारबंदी लागू करण्यात आली होती.
कोरोनाला विसरुन कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला, मात्र वादकांची नावं लिहून घेत पोलीसांनी कारवाई करण्याचा इशारा दिलाय. पोलिसांचा एवढा बंदोबस्त असताना देखील ही गर्दी कशी काय झाली हा प्रश्न उपस्थित होत आहे, त्याच सोबत मंडळाच्या अध्यक्षांना या गर्दी बाबत विचारलं असता त्यांनी ही गर्दी मंडळाची नसून बाहेरून लोकं आले असल्याची माहिती देत स्वतःची जबाबदारी झटकून दिली.