चंडीगड: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा दिला होता. सध्या देशातील राजकारण वेगळे वळण घेत असल्याचे दिसत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि कॉँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात विकोपचा वाद झाला होता. सिद्धू समर्थक ४० आमदारांनी चिठ्ठी लिहून नाराजी व्यक्त केल्यानंतर आता आज या आमदारांची बैठक होत आहे. आज संध्याकाळी ५ वाजता चंदीगडच्या सेक्टर १५ येथील काँग्रेस भवनमध्ये ही बैठक होत असल्याने या बैठकीत होणार होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याशिवाय संध्याकाळी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन नेत्याची निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत माहिती मिळताच अमरिंदर सिंग यांनी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि खासदार मनीष तिवारी यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर थेट राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही, असा निर्वाणीचा इशारा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिला होता. दरम्यान, अमरिंदर सिंग यांनी आधी जर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले गेले तर ते पक्षही सोडतील असंही सांगितलं होतं.