नागपूर: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मात्र अद्याप ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजूनही तसंच रेंगाळत असल्याने आता भाजप आक्रमक झाल्याचे आज दि. 15 सप्टेंबेर रोजी राज्यभरात पाहायला मिळाले. आंदोलन करणारे भाजप नेते चंद्रशेखर बावणकुळे यांना आज पोलिसांनी अटक केली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नागपुरात आंदोलन करणारे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नागपूरच्या मानेवाडा चौकात बावनकुळे आणि शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांनी केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशाराही बावनकुळे यांनी आंदोलनादरम्यान दिला आहे.
आंदोलनात बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारही सहभागी झाले होते. रस्त्यावर बसून वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न या आंदोलनादरम्यान करण्यात आला होता. नागपूरातल्या वर्दळीच्या मानेवाडा चौकातली वाहतूक साधारण अर्धा तास रोखून धरण्यात आली होती.