टिओडी मराठी, परळी, दि. 6 सप्टेंबर 2021 – महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भात एक मोठी आणि धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आलीय. त्यांच्या कुटुंबीयांच्या घातपाताचा कट पोलिसांनी मोठ्या शिताफीने उधळून लावला आहे. याप्रकरणी परळी पोलिसांनी पत्नी असल्याचा दावा करत सातत्याने बेछूट आरोप करणाऱ्या करूणा शर्मा या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे, परळीसह राज्यात मोठी खळबळ उडालीय.
गेल्या २-३ दिवसांपासून करूणा शर्मा फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत होत्या. अगोदरच्या व्हिडीओत त्यांनी अगामी निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते.
तसेच, वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार आहे. त्यांनतर पत्रकार परिषद घेणार आणि मुंडे यांच्या घरी जाणार असे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्याअगोदरच त्यांच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळून आल्याने, हा मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा तर डाव नव्हता? असा संशय व्यक्त केला जातोय.
दुसरीकडे, ही वार्ता वाऱ्यासारखी परळी शहरामध्ये पसरल्यानंतर करूणा शर्मा यांच्या अटकेसाठी आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ परळीतील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या.
आपण धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचे सांगणाऱ्या करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी करण्याचा याअगोदर देखील अनेकदा प्रयत्न केला आहे.
आज थेट त्यांना संपवण्यासाठी डाव आखला आहे, असा आरोप या महिलांनी केलाय. त्यामुळे, त्यांना अटक करण्याची जोरदार मागणी त्यांच्याकडून केली जातेय.