टिओडी मराठी, मुंबई, 27 ऑगस्ट 2021 – अंमली पदार्थविरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने एका नायजेरियन ड्रग्ज तस्कराला जेरबंद केलं आहे. या कारवाईत त्याच्याकडून सुमारे 3 कोटी 90 लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे, असे अमली पदार्थविरोधी पथकाचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज तस्करीसाठी मुंबईत एक नायजेरियन नागरिक येणार आहे, अशी माहिती एनसीबी विभागाला मिळाली. ही गुप्त माहिती मिळताच एनसीबी विभागाने सापळा रचला आणि त्यानुसार एनसीबीने कारवाई करत नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये त्याच्याकडून सुमारे 1 किलो 300 ग्रॅन कोकेन ड्रग्स जप्त केले आहे. जप्त केलेल्या ड्रग्सचे मूल्य सुमारे 3 कोटी 90 लाख रुपये आहे.
सध्या अटक केलेला नायजेरियन नागरिक अमली पदार्थविरोधी पथकाच्या ताब्यात आहे. याबाबत त्याची सखोल चौकशी केली जात आहे. त्याच्या अटकेनंतर मुंबईमधील ड्रग्स तस्करीचे मोठे जाळे हाती लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.