टिओडी मराठी, मुंबई, दि. 19 ऑगस्ट 2021 – शिवसेना पक्षाच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांची आमदारकी धोक्यात आलीय. निवडणुकीवेळी मालमत्तेबद्दल त्यांनी चुकीची माहिती दिली आहे, असे स्पष्ट झाले आहे. स्वतःचे एक कोटी रुपये त्यांनी एका शेल कंपनीकडून कर्ज घेतल्याबद्दल दाखविले आहे, त्याबद्दल आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडे अहवाल दिला आहे, असे सूत्रांकडून समजत आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येणार असल्याचे आढळत आहे.
यामिनी जाधव यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांचा पराभव केला आहे. त्यावेळी शपथपत्रात दिलेल्या संपत्तीवरून वाद निर्माण झालाय.
यामिनी जाधव यांनी एक कोटी कर्ज घेतल्याचा उल्लेख केलाय; पण आयकर विभागाने जेव्हा तपास केला, तेव्हा ही एक बनावट (शेल) कंपनी आहे, असे स्पष्ट झाले.
ही कंपनी कोलकात्यातील असून त्यावर काही आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. त्यातून यामिनी जाधव व त्यांच्या कुटुंबीयांनी नफा मिळविलाय.
परंतु, यामिनी यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये प्रधान डीलर्स नावाच्या एका कंपनीकडून एक कोटी कर्ज घेतल्याचे नमूद केले आहेत. जेव्हा आयकर विभागाने तपास केला, तेव्हा ही प्रधान डीलर्स नावाची शेल कंपनी कोलकात्यामधून उदय महावर नावाचा व्यक्ती चालवत होता.
विशेष म्हणजे, उदय महावर या व्यक्तीचे नाव नॅशनल हेराल्ड प्रकरणातही समोर आले होते. यामिनी जाधव यांनी एक कोटी कर्ज दाखविले आहे, ती रक्कम त्यांची आहे, असा आरोप आयकर विभागाने केलाय.
कंपनी जाधव यांना विकल्याचा जबाब आयकर विभागाने केलेल्या चौकशीमध्ये उदय महावर याचा जबाब नोंदविला. त्यात २०११-१२ मध्ये प्रधान डीलर्स नावाची कंपनी बनविली होती. त्यानंतर ही कंपनी जाधव यांना विकल्याचे नमूद केले आहे.
यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. यामिनी यांनी आपल्याकडे सुमारे ७.५ कोटी रूपये, तर पती यशवंत जाधव यांच्याकडे सुमारे ४.५९ कोटी रूपयांची संपत्ती आहे, असे नमूद केले आहे.