टिओडी मराठी, काबुल, दि. 18 ऑगस्ट 2021 – अफगाणिस्तान देशावर सत्ता काबीज करणारे तालिबानचे उपनेते मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलला परतले आहेत. कतारची राजधानी दोहा इथे संघटनेच्या इतर नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तो गेला होता. मुल्ला बरादर अफगाणिस्तानातील २० वर्षांच्या युद्धाचा विजेता म्हणून उदयास आलाय. त्याला तालिबानचा नायक मानले जात आहे. बरदर अफगाणिस्तानचा पुढील राष्ट्राध्यक्ष बनू शकतो, अशी चर्चा सुरु आहे.
बरदार सध्या दोहा इथे तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख असून तालिबानचा सहसंस्थापक आणि मुल्ला उमरचा सर्वात विश्वासू कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदारला २०१० मध्ये पाकिस्तानच्या कराची येथे अटक केली होती. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानंतर आणि तालिबानशी झालेल्या करारानंतर पाकिस्तानने २०१८ मध्ये त्याला सोडले होते.
मुल्ला अब्दुल गनी बरदारविषयी –
१९६८ मध्ये अफगाणिस्तानच्या उरुझगान प्रांता मध्ये जन्मलेला बरदार सुरुवातीपासून धार्मिक कट्टर आहे. तो तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मेहुणा असून बरदार १९८० च्या दशकात सोव्हिएत युनियन विरुद्ध लढलेला आहे.
१९९२ मध्ये रशियन सैन्याला हाकलल्यानंतर अफगाणिस्तान देशाच्या प्रतिस्पर्धी सरदारांमधल्या गृहयुद्धामध्ये तो अडकला होता. त्यानंतर बरादारने कंधारमध्ये त्याचा माजी कमांडर आणि मेहुणा मुल्ला उमर सोबत मदरसा स्थापन केला. यानंतर मुल्ला उमर आणि मुल्ला बरदार यांनी तालिबानची स्थापना केली आहे.
तालिबान सुरुवातीला देशाच्या धार्मिक शुद्धीकरणासाठी आणि इस्लामी अमीरातच्या निर्मितीसाठी समर्पित तरुण इस्लामिक विद्वानांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ सुरु होती.
सुरुवातीला सर्वकाही सुरळीत पार पडत होते, पण नंतर या गटाने शस्त्र हाती घेतले आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या आदेशावरून यांचा हिंसक चळवळीमध्ये बदल झाला. ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या लष्करी कारवाईमध्ये मुल्ला उमर ठार झाला होता.