टिओडी मराठी, मुंबई, दि. 10 ऑगस्ट 2021 – मागील 2 वर्षांपासून कोरोनामुळे राज्यातील तसेच देशातील अनेक परीक्षा रद्द केल्या होत्या. आता कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने परीक्षा घ्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी होत होती. त्यानुसार आता देशासह राज्यातील परीक्षा घेण्यास सुरूवात झालीय. मात्र, दोन्ही परीक्षेच्या तारखा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांच्या चिंतेत वाढ झालीय.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी टीईटी अर्थात शिक्षक पात्र परीक्षा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी युपीएससीची पूर्व परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. येत्या 10 ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे. ज्या उमेदवारांनी या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेत, त्यांना कोणत्यातरी एका परीक्षेला मुकावं लागणार आहे.
युपीएससीची पूर्व परीक्षा संपूर्ण देशात घेण्यात येत आहे, त्यामुळे राज्य सरकारने टीईटी परीक्षेच्या तारखा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे. शिक्षण विभागाने कोणताही विचार न करता परीक्षा जाहीर केल्या आहेत, असा आरोप उमेदवारांनी केला आहे.
मागील काही काळापासून भरती प्रक्रिया निघाली नसल्याने यंदा अधिक प्रमाणात अर्ज आलेत. मात्र, दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या 25 ते 30 हजारांपेक्षा अधिक आहे. तर युपीएससीसाठी 8 लाख उमेदवारांनी अर्ज भरलेत. महाराष्ट्र राज्यात सध्या 10 लाखांहून अधिक बी.एड धारक विद्यार्थी बेरोजगार आहेत.
त्यामुळे शिक्षक पात्र परीक्षा ही या बी.एड झालेल्या विद्यार्थ्यासाठी महत्वाची आहे. आता यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार? याकडे उमेदवाराचे लक्ष लागलं आहे.