TOD Marathi

नवी दिल्ली :  केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. श्रुती शर्मा ही युवती प्रथम आली आहे तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर देखील मुलींनीच बाजी मारली आहे. अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंगला या महिला उमेदवारांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. ऐश्वर्या वर्मा ऑल इंडिया रँक ४ वर आहे. या परीक्षेत एकूण ६८५ उमेदवार यशस्वी झाले आहेत.

यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर येथे निकाल पाहता येईल. उमेदवारांचे वैयक्तिक गुण निकालानंतर १५ दिवसांनी जाहीर करण्यात येणार आहेत. आयोगाने १७ मार्च रोजी नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ आयोजित केली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिल ते २६ मे २०२२ या कालावधीत घेण्यात आल्या. या परीक्षेच्या माध्यमातून नागरी सेवेतील ७१२ पदे भरली जाणार आहेत.