TOD Marathi

टिओडी मराठी, लातूर, दि. 9 ऑगस्ट 2021 – जोपर्यंत एफआरपीप्रमाणे भाव मिळणार नाही, तोपर्यंत स्‍वस्‍थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष तथा आमदार रमेश कराड यांनी दिला आहे. मांजरा परिवारातील मांजरा, विलास आणि रेणा या साखर कारखान्‍यांनी गाळप केलेल्‍या ऊसाला आतापर्यंत अदा केलेली आणि एफआरपी प्रमाणे होणारी रक्‍कम यातील फरकाची रक्‍कम शेतकऱ्यांना द्यावा, या मागणीसाठी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष तथा आमदार रमेश कराड यांच्‍या नेतृत्‍वाखाली 9 ऑगस्‍ट क्रांतीदिनी मांजरा साखार कारखान्‍यासमोर शेतकरी आंदोलन केले, यावेळी ते बोलत होते.

मांजरा कारखान्‍याच्‍या इतिहासामध्ये पहिल्‍यांदाच शेतकऱ्यांनी आपल्‍या न्‍याय हक्‍काच्‍या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये मांजरा परिवारातील कारखान्‍याच्‍या कार्यक्षेत्रातील ऊस उत्‍पादक शेतकऱ्यासह भाजपचे कार्यकर्ते हजारोच्‍या संख्‍येनी सहभागी झाले होते.

आंदोलनकर्त्‍यांनी या वेळी दिलेल्‍या विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात सहभागी झालेल्‍या नेत्‍यासह आंदोलन कर्त्‍यांनी आंदोलन नंतर आंदोलनस्‍थळी सोबत आणलेली चटणी-भाकरी खावून आंदोलनाचा समारोप केला.

या आंदोलनस्‍थळी भाजप किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप देशमुख, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्‍हेकर, जिल्हा परिषद अध्‍यक्ष राहूल केंद्रे, प्रदिप पाटील खंडापूरकर, भाजपचे संजय दोरवे, किरण उटगे, शिवाजीराव केंद्रे, रामचंद्र तिरूके, अशोक केंद्रे, रोहिदास वाघमारे, गोविंद चिलकुरे, स्‍वाती जाधव, प्रेरणा होनराव, मनिष बंडेवार, ज्ञानेश्‍वर चेवले, मुक्‍तेश्‍वर वागदरे, राजकुमार कलमे, अनिल भिसे, आप्‍पा मुंडे, विक्रम शिंदे, बाबु खंदाडे, प्रदिप मोरे, सूर्यकांत शेळके, बाबासाहेब घुले, सूरज शिंदे, काकासाहेब मोरे, अमोल पाटील, सुरेंद्र गोडभरले, संतोष वाघमारे, शैलेश गोजमगुंडे, भागवत सोट, विजय काळे, हणमंतबापू नागटिळक, उषा रोडगे, ललिता कांबळे, लता भोसले, दिलीप धोत्रे, धनराज शिंदे, शरद दरेकर, भैरवनाथ पिसाळ, अशोक बिराजदार, गोविंद मुंडे, विनायक मगर, श्रीकृष्‍ण मोटेगवकर, अनिल येलगटे, वैभव सापसोड, अनंत कणसे, राजकिरण साठे, अभिषेक आकनगिरे, रमाकांत फुलारी, पांडूरंग बालवाड, राजेंद्र जवंडरे, किरण मुंडे, शंकर चव्‍हाण, प्रताप पाटील, रशिद पठाण, संतोष चव्‍हाण, भाजपचे किसान मोर्चाचे जिल्‍हाध्‍यक्ष साहेबराव मुळे, लातूर तालुकाध्‍यक्ष बन्‍सी भिसे, रेणापूर तालुकाध्‍यक्ष दशरथ सरवदे यांच्‍यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

याबाबत येत्‍या 30 ऑगस्‍टपर्यंत मांजरा परिवारातील साखर कारखान्‍यांनी गाळप केलेल्‍या ऊसाची रक्‍कम एफआरपीप्रमाणे व्‍याजासह शेतकऱ्याच्‍या खात्‍यावर जमा करावी, अन्‍यथा 17 सप्‍टेंबर 2021 मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनी आक्रमकपणे आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष तथा आमदार रमेश कराड यांनी मांजरा कारखान्‍यासमोर शेतकरी आंदोलनामध्ये बोलताना दिला आहे.

मांजराच्‍या उभारणीमध्ये बब्रूवान काळे, उत्‍तमराव मोरे, शिवमुर्ती शेटे मालक, शिवाजीराव सूर्यवंशी, शेख नजीरमियॉ, शिवाजीराव भिसे यांच्‍यासह अनेकांनी मेहनत घेतलेली आहे. रामभक्‍त म्‍हणून स्‍व. बब्रूवान काळे यांनी विलासरावांना साथ दिली.

स्‍व. विलासराव देशमुख यांचे स्‍मारक तर झालेच पाहिजे, यात दुमत नाही. मात्र, मांजरा कराखान्‍याचे देश पातळीवर नावलौकीक करणाऱ्या स्‍व. बब्रूवान काळे यांचाही पुतळा कारखाना परिसरात उभारला पाहिजे, अशी आग्रही मागणी करून आमदार कराड म्‍हणाले, जर कारखान्‍याने नाही उभारला तर शेतकऱ्यांकडून पै -पै गोळा करून पुतळा उभारू, ही आमची अस्मिता आहे.

भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष तथा आमदार रमेश कराड म्‍हणाले, अनेक शेतकऱ्यांनी माझ्यासमोर वेदना मांडल्‍यात. त्‍यांना आधार देण्‍यासाठी हे आंदोलन करत आहे. शेतक-यांना स्‍वाभिमान आणि अभिमान मिळवून दिल्‍याशिवाय राहणार नाही. ऊस उत्‍पादक शेतकरी कारखान्‍याचे मालक असतानाही भावासाठी कारखान्‍याच्‍या दारात बसण्‍याची वेळ आली. तीन वर्षात दोनदा ऊस जातो, शेतकऱ्यांना आतापर्यंत कारखान्‍यांनी २२००/- रूपये दिले, हे काही उपकार केले नाहीत.

शेतकऱ्यांना त्‍यांच्‍या हक्‍काचा, घामाचा, कष्‍टाचा मोबदला मिळालाच पाहिजे. आजपर्यंत सहन केले, यापुढे कदापी सहन करणार नाही. शेतकऱ्यांना भिकारी समजत असाल तर तुम्‍हालाही भिकारी केल्‍याशिवाय शेतकरी राहणार नाही. कारखाना हा शेतकऱ्यांचा पांडूरंग आहे. त्‍याला बडव्‍यांनी कोंडून ठेवलं आहे. बडव्‍यांच्‍या दुष्‍ट चक्रातून पांडूरंगाला मुक्‍त करावे लागेल, असे आमदार कराड म्हणाले.

लातूर ग्रामीणमधील आमदारांनी कोणाच्‍या विरोधात निवडून आला आहात? हे सांगावे. जनतेनी ३० हजार मते नोटाला दिली आहेत का?. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनतेल्‍या आशिर्वादाने ५० हजार मताधिक्‍याने पाठ लावल्‍याशिवाय राहणार नाही. स्‍व. विलासराव विरोधकांना मानसन्‍मान देत होते. मात्र, आजचे मस्‍तवाल पालकमंत्री मगरूर आहेत.

ज्‍या जनतेनी मान सन्‍मान वैभव दिला, ती जनता कोरोनाच्‍या संकटात असताना त्‍यांनी आधार देण्‍याचे काम केलं नाही. राज्‍यात सर्वाधिक भ्रष्‍टाचार आरोग्‍य विभागामध्ये झाला आहे. विधीमंडळाचे अधिवेशन पूर्ण कार्यकाळ झाले असते तर आरोग्‍य खात्‍याच्‍या दोन्‍ही  मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असता.

सहकार क्षेत्रातील होणारी लूट थांबविण्‍यासाठी आणि होत असलेला भ्रष्‍टाचार थांबविण्‍यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सहकार खात्‍याची निर्मीती करून अमित शहा यांच्‍याकडे जबाबदारी दिलीय.

अमित शहा काय करू शकतात? याची जाणीव सबंध देशवाशीयांना आहे. आजच्‍या क्रांती दिनी शेतकऱ्याच्‍या न्‍याय हक्‍कासाठी क्रांतीची मशाल पेटली आहे, असे भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष तथा आमदार रमेश कराड यांनी म्हटले आहे.