टिओडी मराठी, नागपूर, दि. 7 ऑगस्ट 2021 – 100 कोटी वसुली प्रकरणी अडचणीमध्ये आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी बेपत्ता झाले आहे. आज पुन्हा एकदा ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील संस्थांवर छापा टाकला.
ईडीच्या टीमने वर्धा रोड येथील अनिल देशमुख यांच्या ट्रॉयटोल हॉटेलवर छाप टाकला. शुक्रवारीसुद्धा ईडीने अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेच्या NIT कॉलेजवर छापा टाकला होता. यात सुमारे 3 तास ईडीची ही छापेमारी सुरु होती.
अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांनी ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी साई शिक्षण संस्थेच्या वापर केला आहे, असा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्लीच्या एका व्यापाऱ्याने डोनेशन म्हणून या शिक्षण संस्थेत पैसे टाकले होते. त्यासाठी बोगस शेल कंपन्यांचा वापर केला. त्याचाच तपास करण्यासाठी ईडीचे एक पथक NIT कॉलेजमध्ये पोहोचले होते.
ईडीने सोबत सीआरपीएफचे एक पथक आणले होते. नागपूरमधील अनिल देशमुख यांच्या संस्थेवर छापा पडण्याची ही चौथी वेळ आहे. या अगोदर सुद्धा नागपूरमधील त्यांच्या जवळच्या लोकांवर छापे टाकले होते.
ईडीने अनिल देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋृषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावला. या समन्सनुसार अनिल देशमुख यांना आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखांना ई़डीने चौकशीसाठी बोलावले होते. पण, देशमुख कुटुंबीय चौकशीला हजर राहिले नाही.
30 जुलैला ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावलंअसून चौकशीला हजर न राहिल्यास ईडी कठोर कारवाई करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, देशमुख कुटुंबीय अजूनही नॉट रिचेबल आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबीय चौकशीला आले नाही, अशी माहिती समोर येत आहे.