टिओडी मराठी, पुणे, दि. 3 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल आज 3 ऑगस्ट रोजी जाहीर झाला असून 12 वीचा एकूण निकाल 99.63 टक्के लागला आहे. कोरोना काळामध्ये परीक्षेविना जाहीर झालेला हा HSC चा ऐतिहासिक निकाल ठरलाय. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
यंदा 35 टक्के गुण मिळालेले 12 विद्यार्थी पास झाले आहेत. तर 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के मिळालेत. एकाही शाळेचा किंवा ज्युनिअर कॉलेजचा निकाल यंदा शून्य टक्के नाही. मागील वर्षीचा निकाल 96.93 टक्के होता.
यंदा विज्ञान शाखेचा निकाल 99.55 टक्के, कला 99.83 टक्के, वाणिज्य शाखेचा 99 .91 टक्के निकाल लागलाय. बारावीच्या निकालातही कोकण विभागाचा निकाल तब्बल 99.81 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागलाय. औरंगाबाद विभागाचा निकाल 99.34 टक्के लागलाय.
इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल आज 3 ऑगस्ट रोजी जाहीर झाला असून निकालाच्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील आणि त्या माहितीची प्रिंट काढता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत गुणमापन पद्धतीनुसार यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन आणि मूल्यांकन केले आहे.
अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच बारावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत आणि तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण यानुसार यंदा निकाल जाहीर होणार आहे.
श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल यंदा तयार केलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींत या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पुढील एक, दोन संधी उपलब्ध असणार आहेत.