टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 1 ऑगस्ट 2021 – पेगासस फोन टॅपिंग प्रकरणाची विद्यमान किंवा सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून स्वतंत्रपणे चौकशी करावी, या मागणीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये येत्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार एन. राम आणि शशी कुमार यांनी ही याचिका दाखल केलीय. सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शुक्रवारी वरिष्ठ वकील कपिल सिबल यांनी या याचिकेबद्दल केलेल्या निवेदनाची नोंद घेतली आहे.
फोन टॅपिंग विषयाच्या व्यापक गुंतागुंत वाढवणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर ही याचिका तातडीने सुनावणीस घेणे आवश्यक आहे, असे सिबल निवेदनात म्हणाले होते.
फोन टॅपिंगमुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर परिणाम होतोय, असे एन. राम आणि शशी कुमार यांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने म्हटले आहे. विरोधी पक्ष नेते, पत्रकार एवढेच नव्हे न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांवरही लक्ष ठेवले आहे, असे हा वकील म्हणालेत.
याचिकेतून सरकारने स्पाइवेयरसाठी लायसेंस मिळवले किंवा याचा वापर कुणावर लक्ष ठेवण्यासाठी केला का?, असा प्रश्न विचारला आहे. तसेच, एमनेस्टी इंटरनॅशनलच्या सिक्योरिटी लॅबद्वारे फॉरेंसिक तपासात समोर आलंय कि, पेगासस सॉफ्टवेअरद्वारे काही ठराविक लोकांचे फोन टॅप केलेत, अशी माहिती याचिकाकर्त्यांनी दिलीय.
जाणून घ्या, पेगासस प्रकरण ?
काही दिवसांपूर्वी काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी खुलासा केला होता की, इस्रायलमधील पेगाससस सॉफ्टवेअरच्या मदतीने भारतासह जगामधील अनेक देशांमधील पत्रकार, नेते आणि मोठ्या व्यक्तींचे फोन टॅप केले आहेत.
भारतात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रशांत किशोर, पत्रकार एन. राम यांच्यासह अनेकांचे फोन टॅप केले आहेत, असे त्या रिपोर्टमधून सांगितलं आहे. तो रिपोर्ट समोर आल्यापासून विरोधक सरकारवर सतत निशाणा साधत आहेत.