टिओडी मराठी, उल्हासनगर, दि. 31 जुलै 2021 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चहावाला’ म्हणण्यापेक्षा ‘चहावाल्याचा मुलगा’ म्हणा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी पत्रकारांना चिमटा काढत दिला. ते म्हणाले, आम्ही सर्व भावंडांनी चहा विकला आहे. पण, ज्याचा मुकुट मोठा, पत्रकार त्याला चालवतात. उल्हासनगर ट्रेड असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रल्हाद मोदी म्हणाले, आम्हा 6 भावंडांना आमच्या वडिलांनी चहा विकून मोठे केलं आहे. पण, पत्रकार नरेंद्र मोदी यांना ‘चहावाला’ म्हणत आहेत. हि त्यांची चूक आहे. जर म्हणायचे असेल, तर त्यांना ‘चहावाल्याचा मुलगा’ म्हणा. यावेळी प्रल्हाद मोदी यांनी पत्रकारांना चिमटा काढला. स्वतःला ‘चहावाला’ म्हणवून घेणाऱ्या नरेंद्र मोदींनाच विचारा, असे म्हंटलंय.
तुम्ही रेफ्युजी म्हणत अजून किती दिवस रडत बसणार आहात?. एकीचे बळ दाखवा अन आता लढायला शिका. जीएसटी भरायला सामूहिकरित्या नकार द्या. मग, बघा उद्धव ठाकरेच नव्हे. तर, नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील, असे आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना केले.
ऑल इंडिया फेअर प्राईझ शॉप असोसिएशनचे प्रल्हाद मोदी हे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. गेल्या दोन वर्षात लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागलं आहे.
अशात सरकारी पातळीवरून कुठलीही मदत मिळत नाही. त्यामुळे आपला आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशन या व्यापाऱ्यांच्या संघटनेने प्रल्हाद मोदी यांना निमंत्रित केलं होतं.
व्यापाऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये आपल्या समस्या प्रल्हाद मोदी यांच्याकडे व्यक्त केल्यात. तसेच केंद्र सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याची मागणी केलीय. उल्हासनगर शहर हे निर्वासितांचे शहर आहे.
या शहराला सरकारने विशेष निधी द्यावा, अशी मागणीही यावेळी केली. यावर बोलताना रेफ्युजी म्हणून किती दिवस रडणार आहात? आता लढायला शिका, असे आवाहन प्रल्हाद मोदी यांनी केलं आहे.
प्रल्हाद मोदी म्हणाले की, तुमच्या शहराचा विकास होत नसेल आणि सरकारचे लक्ष वेधायचे असेल, तर सामूहिकपणे जीएसटी भरायला नकार द्या. मग, पहा, उद्धव ठाकरे नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील.
तर यानंतर आम्ही जीएसटी केंद्राला भरतो, त्यामुळे आम्ही केंद्राला जाब विचारणार, अशी भूमिका उल्हासनगर ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी स्पष्ट केलीय.
उल्हासनगरातील अनेक व्यापाऱ्यांवर लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल केलेत. इतर राज्यांनी हे गुन्हे मागे घेतले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातही हे गुन्हे मागे घ्यावेत, अशीही मागणी यावेळी केली आहे. या कार्यक्रमाला उल्हासनगरमधील सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.