टिओडी मराठी, लातूर, दि. 25 जुलै 2021 – ओबीसीच्या अनेक जाती असल्या तरी आपली माती आणि नाती एक आहे. या जागर मेळाव्यातून ओबीसीची नवी मशाल महाराष्ट्र राज्यात पेटली आहे. ओबीसीचे प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही, तोपर्यंत ही मशाल विझणार नाही, असे प्रतिपादन ओबीसी नेते, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. लातूर इथे आयोजित लातूर येथील ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचाव जागर मेळाव्यात ते बोलत होते.
लातूर येथे ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचाव जागर मेळावा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. ओबीसी नेते राज्याचे मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फ्ररनसिंगच्या माध्यमातून ओबीसीची जागर मशाल प्रज्वलीत केली.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.अण्णाराव पाटील आणि उदघाटक महापौर विक्रांत गोजमगुंडे व सर्व मान्यवर, समाज बांधवाच्या हस्ते ओबीसीची जागर मशाल पेटविली. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत तोपर्यंत ही मशाल विझणार नाही, असा निर्धार देखील या मेळाव्यात घेण्यात आला. या मेळाव्यासाठी राज्यभरातून सर्वपक्षीय नेते, ओबीसी संघटनांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला आहे.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून मेळाव्याला संबोधित केले. छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी समाजाला वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागला आहे. त्यानंतर काहीतरी न्याय आणि हक्क मिळाला आहे. प्रत्येक संकटाला तोंड देत आपण पुढे चाललोय.
भटक्या विमुक्त, वंचित, शोषित ओबीसी समाजबांधवाची खरी परिस्थिती या निमित्ताने समोर आणायला हवी. तसेच समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना न्याय दिला पाहिजे, हि जबाबदारी आपली आहे. यासाठी आपल्यालाच पराक्रमाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. असंही भुजबळ म्हणाले.
तसेच ओबीसी आरक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकारवर सकारात्मक दबाव निर्माण करण्यासाठी आजचा हा जागर मेळावा घेतला आहे असे मत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले. तसेच 2021 मध्ये होणारी जनगणना जातीनिहाय झाली पाहिजे. तेव्हाच ओबीसी समाज मुख्य प्रवाहात येणार आहे. ओबीसीची मशाल पेटवून ज्योत प्रज्वलित केली आहे.
हीच ज्योत प्रत्येकांच्या मनामनात, खेड्या-पाड्यात, गल्लीत, शहरातील प्रत्येक ओबीसी बांधवापर्यंत पोहचवायची आहे. मी ओबीसी आरक्षणामुळे महापौर झालो आहे. उद्या जर आरक्षण गेलं तर भविष्यात ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व धोक्यात येणार आहे. म्हणून आज आवाज उठवत आहे. जोपर्यंत ओबीसीचे आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ नयेत, असा ठराव राज्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थानी घ्यायला हवा.
प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री यांच्याकडून ओबीसीला न्याय मिळवून देण्यासाठी ते कटिबद्ध राहतील, असे पत्र घेण्याची मोहिम सुरु करूया. असेही महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले.
यावेळी ओबीसी नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील राजकीय हेतू न ठेवता समाजाच्या हितासाठी ओबीसींनी एकत्र यायला हवं. ओबीसींच्या सर्व जातींना एकत्र आणण्यासाठी तारेवरची कसरत होणार आहे. सर्वांनी एकत्र येत एक नवीन संकल्प करून एकजूट, एकमूठ, एक वज्रमूठ तयार करूया असं मत मांडले.