टिओडी मराठी, पुणे, दि. 13 जुलै 2021 – नवे शैक्षणिक धोरण हे भारत केंद्रीत असून यामुळे नवीन पिढ्या भारताच्या गौरवशाली परंपरेला जोडल्या जातील, असा विश्वास विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थेचे केंद्रीय संघटन मंत्री जे. एम्. काशिपती यांनी रविवारी (दि. 11) व्यक्त केला आहे. विद्या भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या पायाभूत शिक्षण प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. नवे शैक्षणिक धोरण हे भारताच्या सूचक भविष्याचा प्रारंभ आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षणावर आधारीत एका ‘ई-पुस्तिके’ चे प्रकाशन जाधव यांच्या हस्ते झाले.
नवे शैक्षणिक धोरणानुसार पहिल्या टप्प्यातील शिशूवर्ग ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या टप्प्यातील शिक्षणाला पायाभूत शिक्षण’, असे संबोधले आहे. मागील ४ ते ११ जुलै असे आठ दिवस ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या वर्गात या गटातील विद्यार्थ्यांना नवे शैक्षणिक धोरणानुसार शिकवतांना कोणकोणत्या पद्धतींचा वापर करावा?, शिशू केंद्रीत, संस्कारक्षम आणि अनंददायी शिक्षण कसे द्यावे? याचे प्रशिक्षण या दिले आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यामधून ३२१ शिक्षक, संस्थाचालकांसह पालक या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते.
यावेळी काशिपती म्हणाले, शैक्षणिक धोरण हे कालसुसंगत असले पाहिजे. त्या पद्धतीने नवे शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार केला आहे. शिक्षण हे केवळ शासन, प्रशासनाची जबाबदारी नाही. त्यासाठी सामाजिक सहभाग देखील महत्त्वाचा असतो. सर्व प्रकारची सावधानता बाळगत नवे शैक्षणिक धोरण समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. विद्या भारतीचे देशातील कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्नशील आहेत. समाजातील अन्य शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि पालकही त्यास जोडले पाहिजेत.
त्यानंतर जाधव म्हणाले, पारतंत्र्यामध्ये इंग्रजांनी भारतातील पारंपारिक शिक्षण पद्धतीवर घाव घातला. स्वातंत्र्यानंतर प्रथम देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे, असा आग्रह स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी धरला होता. मात्र, स्वातंत्र्यानंतर तत्कालिन काँग्रेस सरकारच्या धोरणांत त्याला वाव नसल्याने स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे मेकॉलेची शिक्षण पद्दत अवलंबिण्यात येतेय.
सुदैवाने २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकारने शैक्षणिक धोरणात बदल करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केलीय. नवे शैक्षणिक प्रणाली ही क्रांतीकारक निर्णय आहे. ती भविष्यात जगाला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटत आहे.
या कार्यक्रमाला विद्या भारतीच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे क्षेत्र संयोजक सदाशिव ऊर्फ भाई उपाले, पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष अनिल महाजन, प्रांत मंत्री मोहन कुलकर्णी, सहमंत्री रघुनाथ देविकर, सुनीता जाधव, आणि इतर कार्यकारीणी सदस्य आदी उपस्थित होते. नाशिकहून सविता कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले तर, पुण्याच्या प्रगती भावसार यांनी संपूर्ण तांत्रिक बाजू सांभाळलीय.