टिओडी मराठी, वॉशिंग्टन, दि. 12 जुलै 2021 – आधुनिक काळात स्मार्टफोन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, या स्मार्टफोनचे काही तोटेही समोर आलेत. जर सतत दहा वर्षे तुम्ही दररोज किमान 17 मिनिटे स्मार्टफोनचा वापर करत असाल तर, तुम्हाला कर्करोग होण्याचा धोका संभवू शकतो, असं आता एका संशोधनातून समोर आलं आहे.
यामुळे कर्करोग होण्याचा शक्यता 60 टक्क्यांनी वाढू शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हा दावा केला आहे कि, नागरिकांनी स्मार्टफोन वापरण्यावर बंधने घालून घ्यायला हवीत.
संशोधकांनी स्मार्टफोन आणि मानवी जीवन याच्याशी संबंधित 46 घटकांचा अभ्यास या संशोधनात केला आहे. तेव्हा हा निष्कर्ष समोर आला आहे. दहा वर्षे दररोज किमान 17 मिनिटे स्मार्टफोनचा वापर करत असाल तर कर्करोग होण्याचा धोका 60 टक्के अधिक संभवू शकतो.
संशोधन करणाऱ्या संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मोबाइल सिग्नलमधून निघणाऱ्या रेडिएशनचा शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. अर्थात अमेरिकेतील फुड अँड ड्रग अकॅडमीने मात्र या संशोधनाचा इन्कार केला आहे. अशा प्रकारचा कोणताही धोका मोबाईलच्या माध्यमातून होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
संशोधकांनी मात्र मोबाईलच्या ऐवजी लँडलाईन चा वापर करण्यावर भर दिलाय. त्यांनी अमेरिका स्वीडन ब्रिटन जपान साऊथ कोरिया व न्यूझीलंडमधील लोकांवर संशोधन करून हा निष्कर्ष काढलाय. जगात सर्वत्र मोबाईलचा वापर वाढला आहे. 2011 पर्यंत जगातील 87 टक्के घरात मोबाईल होते.
2020 अखेरीस हा आकडा 95 टक्के पर्यंत पोहोचला. संशोधक टीमचे प्रमुख ज्वेल मॉस्कोबिट्स यांनी लोकांनी मोबाईल फोनचा वापर कमी करावा, असे आवाहन केलं आहे. वायरलेस उपकरणांमुळे रेडिएशन ऊर्जा सक्रिय होत असते. तसेच तिचा शरीराला त्रास होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल हेल्थ सायन्सने 2018 मध्ये केलेल्या संशोधनामध्ये मोबाईलच्या वापरामुळे जे रेडिएशन तयार होते. त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका सूचित केला होता.