टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 12 जुलै 2021 – अभिनेत्री जुही चावलाने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये 5G विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरून देशात चर्चा सुरू असतानाच या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्या. संजीव नरुला यांनी या केसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. या प्रकरणात 20 लाख रुपयांचा दंड अभिनेत्री जुही चावलाला ठोठावला होता. त्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान आता न्यायाधीशांनी या केसमधून बाहेर पडण्याचा निर्णय़ घेतला आहे, त्यामुळे आता नव्या न्यायाधीशांसमोर पुन्हा याची सुनावणी होणार आहे.
देशात येणाऱ्या 5G नेटवर्कमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणाच्या संतुलनावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी याचिका अभिनेत्री जुही चावलाने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, ही याचिका खोडसाळ आहे.
कोर्टाचा वेळ वाया घालवल्याप्रकऱणी न्यायाधीशांनी जुही चावलाला 20 लाख रुपयांचा दंड सुनावला होता. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात जुही चावलानं पुन्हा दाद मागितली होती. त्यावर सुनावणी पूर्ण होण्यापूर्वीच या प्रकरणातील न्यायाधीशांनी खटल्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.
जाणून घ्या, काय म्हणाले न्यायाधीश?
अशा याचिकांमुळे आपण हतबुद्ध झालो आहोत, असे न्या. संजीव नरुला यांनी म्हटलंय. न्यायालयाने लावलेला दंड योग्यच आहे. या प्रकरणात न्यायालयाचा अवमान झाल्याची नोटीसही पाठवता आली असती.
मात्र, न्यायालयाने मनाचा मोठेपणा आणि औदार्य दाखवत तसं केलं नाही, हे जुही चावलाने समजून घेणं आवश्यक आहे. अन्यथा त्याचा वेगळा खटला चालवावा लागला असता. या प्रकरणामुळं आपण बैचेन असून या खटल्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असे न्या. नरुला यांनी म्हटलं आहे.
जुही चावलाने ही याचिका केवळ सवंग प्रसिद्धीसाठी दाखल केली होती, असा निर्वाळा देत न्यायालयाने 4 जूनला ती फेटाळून लावली होती. जुही चावलाला 20 लाख रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली होती. तर त्यावर प्रतिक्रिया देताना जुही चावलाने आपला लढा सुरूच राहणार आहे, असं म्हटलं होतं.
दूरसंचार विभागाच्या सगळ्या योजना प्रत्यक्षात पूर्ण झाल्या. तर पृथ्वीवरील सर्व माणसं, प्राणी, पक्षी व किटकांवरही त्याचा दुष्परिणाम होईल, अशी प्रतिक्रिया जुही चावलाने दिली होती.