टिओडी मराठी, बारामती, दि. 11 जुलै 2021 – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बारामती इथल्या गोविंदबाग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारने नव्याने तयार केलेलं सहकार खातं, विधानसभा अध्यक्षपद, समान नागरी कायदा या महत्वपूर्ण विषयांवर भाष्य केलं.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे, विधानसभा अध्यक्षपदी नक्की कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशात महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी अध्यक्षपदाबाबत वक्तव्य केल्याने याबाबतचा संभ्रम वाढलाय. मात्र, आज शरद पवार यांनी याबाबत वक्तव्य करत याबाबतच्या सर्व चर्चेला पूर्णविराम दिला.
विधानसभेच्या अध्यक्षपदावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, आमच्या तीन पक्षाचा स्वच्छ निर्णय झालाय. विधानपरिषदेचे अध्यक्ष पद काँग्रेसकडे होतं आणि ते पद काँग्रेस पक्षाकडेच राहणार आहे. आम्हाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे याबाबत कोणीही काही बोलायचा संबंध येत नाही.
समान नागरी कायद्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकार जोपर्यंत समान नागरी कायदाबाबत काही भूमिका घेत नाही. तोपर्यंत भाष्य करणे योग्य होणार नाही. निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, ते काय करतात?. यावर आमचं लक्ष आहे.