टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 जुलै 2021 – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनीही गुरूवारी इंधन दरवाढीविरोधात निदर्शने केली. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर त्वरित निम्म्याने कमी करा, अशी मागणी शेतकरी आंदोलकांनी केली आहे.
कृषी कायद्यांविरोधात शेतकरी ७ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने इंधन दरवाढीविरोधात देशव्यापी निदर्शने करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी देशात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
निदर्शनांचा भाग म्हणून शेतकरी महामार्गांलगत त्यांच्या वाहनांसह जमा झाले होते. या निदर्शनांसाठी दोन तासांचा कालावधी निश्चित केला होता. निदर्शनांमुळे वाहतुकीवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली होती.
निदर्शनांवेळी इंधन दरवाढ मागे घेण्याच्या मागणीकडे नरेंद्र मोदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ५ मिनिटांसाठी वाहनांचे हॉर्न वाजवण्यात आले. सरकारला जागे करण्यासाठी ती कृती केली आहे, असे आंदोलकांनी यावेळी म्हटले.
निदर्शनांवेळी सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणाही दिल्या. इंधन दरवाढीविरोधातील निदर्शनांना पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये लक्षणीय प्रतिसाद मिळाला आहे.