टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 25 जून 2021 – जम्मू काश्मीर राज्यात प्रथम निवडणूक घेऊन त्यानंतर त्या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबत विचार केला जाईल, अशी जी भूमिका केंद्र सरकारने घेतलेली आहे ती घातक आहे, असे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
सरकारने प्रथम जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला पाहिजे आणि त्यानंतर तेथे निवडणुका घेतल्या पाहिजेत, अशी आमची आणि अन्य पक्षांची मागणी आहे, असेही पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
घोडागाडीला आधी घोडा असतो आणि नंतर त्याच्या मागे गाडी जोडलेली असते. पण, या सरकारला गाडीच्या मागे घोडे बांधायचे आहेत, अशा शब्दांत केंद्र सरकारच्या भूमिका आणि कारभारावर टीका केली आहे.
त्याची गरज काय? असा सवालही काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केलाय. काल केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील विविध पक्षांच्या नेत्यांना दिल्लीमध्ये पाचारण करून त्यांच्याशी काश्मीरातील स्थितीबाबत चर्चा केली होती.
त्यात सरकारने अगोदर निवडणूका घेऊन तेथील लोकशाही प्रक्रिया सुरळीत करण्याची ग्वाही दिली होती. निवडणूक प्रक्रियेनंतर त्या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवर विचार होऊ शकतो, असे केंद्र सरकारने म्हटले होते.