टिओडी मराठी, पुणे, दि. 23 जून 2021 – मागील महिन्याभरापासून अधिक काळ परदेशात असणाऱ्या अदर पूनावाला यांनी सतत धमक्या मिळत आहेत, असा आरोप केल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ माजली होती. यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचे जाहीर केले होते. या दरम्यान आता ते पुण्यात परतले आहेत. हे प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला हे भारतात असुरक्षित वाटत असल्याने लंडनला गेले होते. मात्र, आज अखेर पुनावाला हे भारतात परतले आहेत. पुण्यात खासगी विमानाने अदर पूनावाला दाखल झाले.
भारतात एकीकडे अधिक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु असताना दुसरीकडे सिरमच्या कोव्हिशिल्ड लसीला जास्त मागणी आहे. देशात करोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असताना यादरम्यान मे महिन्यात अदर पूनावाला लंडनला निघून गेले.
अदर पूनावाला यांनी आपण उद्योगाच्या निमित्ताने लंडनला जात आहे. तेथील काम संपल्यानंतर परतणार आहे, असे सांगितले होते. सिरमचा लंडनमध्येही आपले पाय रोवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
सिरम केवळ भारतात नाही तर जगभरातील सर्वात मोठ्या लसनिर्मिती कंपन्यांत गणली जात आहे. सिरम कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन करत आहे. आतापर्यंत सर्वाधिक वापर झालेल्या लसींत तिचा समावेश आहे. ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान सिरम केंद्र सरकारला सुमारे ५० कोटी लसींचे डोस पुरवणार आहे.
अदर पूनावाला यांनी नुकतेच ट्विट करत ब्रिटनमध्ये भागीदार आणि भागधारकांसोबत चांगली बैठक झाली आहे, असे सांगितले होते. तसेच पुण्यात कोव्हिशिल्डचे उत्पादन वेगाने सुरु आहे, अशी माहिती दिली होती. काही दिवसांत मी परतणार आहे, यावेळी कामाची पाहणी करण्यास उत्सुक आहे, असे ते म्हणाले होते.
Had an excellent meeting with all our partners & stakeholders in the U.K. Meanwhile, pleased to state that COVISHIELD’s production is in full swing in Pune. I look forward to reviewing operations upon my return in a few days.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) May 1, 2021