टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 18 जून 2021 – ऐन कोरोना काळात चर्चेत आलेल्या ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. दिल्लीतील मालवीयनगर भागामध्ये राहणाऱ्या कांता प्रसाद यांनी दारू पिऊन झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हि घटना गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास घडली.
कांता प्रसाद यांना रात्री उशिरा दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात दाखल केले आहे. आता बाबा कांता प्रसाद धोक्याच्या बाहेर आहेतअशी माहिती पोलिसांना रुग्णालयाकडून मिळाली आहे.
यूट्यूबर गौरव वासनने नुकतीच पुन्हा कांता प्रसाद यांची भेट घेतली होती. तसेच बाबांसोबतचे समज-गैरसमज दूर केले होते. बाबांनी गौरववर केलेल्या आरोपांनंतर अधिक प्रमाणावर लोकांनी ‘बाबा का ढाबा’वर जाणे बंद केले होते. यानंतर कांता प्रसाद यांनी माफी मागितली होती.
माफी मागताना बाबा म्हणाले होते :
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, ‘गौरव वासन. तो मुलगा काही चोर नव्हता, ना आम्ही कधी त्याला चोर म्हटले. आमच्याकडून एक चूक झाली. यासाठी आम्ही क्षमा मागतो आणि जनतेला म्हणत आहोत, की जर काही चुकल असेल तर आम्हाला माफ करा.’
बाबा झाले होते स्टार :
दिल्लीतील मालवीय नगर येथे ढाबा चलवणारे कांता प्रसाद हे मागील वर्षी अचानक चर्चेत आले होते. यू-ट्यूबर गौरवने त्यांच्या ढाब्याचा व्हिडिओ तयार केला होता. यानंतर त्यांच्या ढाब्याची विक्री वाढली होती. त्यामुळे कांता प्रसाद रातो-रात स्टार झाले होते.
मात्र, यानंतर कांताप्रसाद यांनी गौरववर फसवणुकीचा आरोप केला. यानंतर लॉकडाऊन लागल्याने कांता प्रसाद यांच्या कामावरही त्याचा परिणाम झाला होता. ‘बाबा का ढाबा’ शिवाय सुरू केलेले आणखी एक रेस्टॉरंट यादरम्यान बंद पडले.