टिओडी मराठी, सोलापूर, दि. 13 जून 2021 – भाजपच्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यानंतर आता भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या बनावट जात प्रमाणपत्राच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या बनावट जात प्रमाणपत्राचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. गुन्हे शाखेने दाखल्यासंदर्भात सर्वच ठिकाणी जाऊन सखोल चौकशी केलीय. त्यासंदर्भातील स्वतंत्र अहवाल तयार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय.
उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. याप्रकरणी 5 जुलैला उच्च न्यायालयात समिती म्हणणे मांडणार आहे, अशी माहिती जात पडताळणी समितीचे सहायक आयुक्त संतोष जाधव यांनी दिलीय.
भाजपचे खासदार डॉ. महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांच्यासह अन्य काहींनी केली होती. त्यानंतर समितीने सखोल चौकशी केली. जातीचा दाखला बनावट असल्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर अक्कलकोटच्या तत्कालीन तहसीलदारांच्या फिर्यादीनुसार गुन्हाही दाखल झाला आहे.
या दरम्यान, खासदार डॉ. महास्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि कारवाईला स्थगिती मिळवली. न्यायालयाच्या आदेशानुसार शहर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला आहे.
आता तो तपास अंतिम टप्प्यात आला आहे. उच्च न्यायालयातून स्थगिती उठल्यानंतर त्यासंदर्भातील दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले जाणार आहे. असेही पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.