टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 28 मे 2021 – मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतल्याचं समजत आहे. आता खासदार संभाजीराजे नवा पक्ष स्थापन करणार आहे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यात या मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहेत.
संभाजीराजे हे नवीन पक्ष किंवा संघटना स्थापन करून मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणार आहेत. या लढ्यात ते बहुजन समाजाला एकत्र आणून मराठा आरक्षण लढा नव्याने सुरू करणार आहेत, असा अंदाज लावण्यात येतोय. यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेनही सुरू केलं आहे.
या दरम्यान संभाजीराजे हे खासदारकीचा राजीनामा देऊन मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करतील. तसेच शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन पुन्हा खासदार पद मिळवतीलत, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या संदर्भातील भूमिका संभाजीराजे आज स्पष्ट कऱणार आहेत.
तसेच संभाजीराजे उद्या प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणार आहे, असे समजतं आहे. त्यामुळे संभाजीराजे कोणता नवीन पक्ष स्थापन करणार? की महाविकासआघाडीसोबत जाणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.