टिओडी मराठी, दि. 25 मे 2021 – तथागत गौतम बुद्धांचा शांती, प्रज्ञा आणि करुणेचा संदेश आज जगासाठी मार्गदर्शक असाच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बुद्ध जयंती हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील साजरा केला जातो. यंदा बौद्ध पौर्णिमा 26 मे दिवशी आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संदेशात म्हणतात, भगवान बुद्धांच्या जीवनातून आपल्याला आव्हानांवर मात करण्याची दिशा मिळते. त्यांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश आजच्या घडीला जास्त समर्पक आहे. यातच त्यांच्या विचारांची सार्वकालिकता आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांना कोटी कोटी प्रणाम आणि या पवित्र पर्वानिमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा.
भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आदर करणारे आजही शांततेचा मार्ग निवडतात. बौद्ध धर्मीयांसाठी वैशाख पौर्णिमेचा दिवस हा खास असतो. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बौद्ध यांचा जन्म आणि निर्वाण दोन्ही वैशाख पौर्णिमेदिवशीच झालं असल्याने या दिवसाचं विशेष महत्त्व आहे.
जगाला दया, क्षमा, शांती व संयमाची शिकवण देणारे गौतम बुद्ध आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांची शिकवण आज जगाला कठीण काळातही सामना करण्यासाठी ताकद देते.
‘बुद्ध’ म्हणजे ज्ञानाची अवस्था :
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. त्याला दिव्य ज्ञान, बुधत्त्व किंवा निर्वाण असेही म्हटले जाते. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सामान्य सिद्धार्थ गौतम यांची ओळख ‘बुद्ध’ अशी झाली. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य म्हणून ओळखला जातोय. गौतम बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधीवृक्ष’ म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष म्हणून ही ओळखले जाते.