टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 24 मे 2021 – केवळ 45 च्या वरील वयोगटाला नव्हे तर आता 18 ते 44 वयोगटाला हि करोना लस दिली जाणार आहे. तसेच करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम वेगाने राबविण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हि करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची गरज नसून त्यांना लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध होणार आहे.
याबाबत आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 44 या वयोगटातील नागरिकाला नोंदणीशिवाय थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येईल. तेथे पोचल्यानंतर त्यांची नोंदणी कोविन ॲपवर www.cowin.gov.in करण्यात येईल. अनेक ठिकाणी ऑनलाइन स्लॉट बुकिंग केल्यानंतरही लस घेण्यासाठी लोक गैरहजर राहत असतात. त्यामुळे लस वाया जाण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात येत आहे.
या व्यतिरिक्त ग्रामीण भागातील लोकांना अद्यापही ऑनलाईन नोंदणी विषयी पुरेशी माहिती नाही. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
या दरम्यान ही सुविधा केवळ सरकारी कोविड लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. सध्या ही सुविधा खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार नाही. खासगी केंद्रांत लसीकरणासाठी अद्याप ऑनलाइन नोंदणीद्वारे स्लॉट बुक करावे लागणार आहेत.