टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 मे 2021 – महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यासाठी 18 वर्षांच्या पुढील सर्वांना लसीकरण करणे आवश्यक आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात 24 तास लसीकरण मोहिम राबवा, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. रविवारी बालरोगतज्ज्ञांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली.
देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तसेच या लाटेसाठी कारणीभूत असलेला व्हेरियंट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बालरोगतज्ज्ञांसोबत रविवारी ऑनलाईन बैठक बोलावली होती. यावेळी सर्व डॉक्टर मंडळी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “कोरोना प्रतिबंधक लसींचा सुरळीत पुरवठा होत नसल्याने राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित केला आहे. मला आशा आहे की, जून महिन्यापासून लसींची उत्पादन क्षमता वाढेल. त्यानंतर आपण राज्यात २४ तास लसीकरण मोहिम राबवू शकतो”
या दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट जवळपास आटोक्यात आलीय. पण तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तिसरी लाट येणार असून लहान मुलांना त्याचा जास्त धोका आहे. तज्ज्ञांच्या या सल्ल्यानंतर देशभर तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरु झालीय. महाराष्ट्र सरकार देखील यात मागे नाही.
लहान मुलांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना केली आहे. याच टास्कफोर्ससह राज्यातील जनतेसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला. विरोधकांकडून होणारी सतत टीकेची झोड आणि एकंदर कोरोना परिस्थितीची आपल्याला जाणिव आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपली बाजू स्पष्ट केली आहे.