पुण्यात 70 केंद्रांवर लसीकरण सुरु; मिळाले कोव्हिशील्ड लसचे 13 हजार डोस

टिओडी मराठी, पुणे, दि. 23 मे 2021 -पुणे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण सुरु झालं असून सरकारकडून महापालिकेला कोव्हिशील्ड लसचे 13 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आज महापालिकेच्या 70 केंद्रांवर 45 वयाच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण करण्यात येत आहे. पुणे महापालिकेतर्फे आजच्या लसीकरणासंबंधी माहिती दिलीय.

22 मे रोजी अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे पुण्यातील सर्व लसीकरण बंद ठेवली होती. या दरम्यान शहरातल्या काही खासगी रुग्णालयांनी थेट कंपनीकडून लस खरेदी केल्यानं तेथेही लसीकरण सुरु आहे. आज पुण्यामध्ये कशा पद्धतीनं लसीकरणाचे नियोजन केलं असेल यासंदर्भातली माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरुन दिलीय.

केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील लसीकरणास परवानगी दिलीय. मात्र, अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे आज पुण्यात 45 वयाच्या पुढील नागरिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसला प्राधान्य दिलं जात आहे.

पुणे महापालिकेला मंगळवारी कोव्हिशील्डचे केवळ साडे सात हजार आणि बुधवारी अडीच हजार कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध झालेत. डोस मिळाल्याने दोन दिवस लसीकरण झाले आहे. मात्र, त्यानंतर सरकारकडून लस उपलब्ध न झाल्याने शुक्रवारी आणि शनिवार असे दोन दिवस महापालिकेने सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवली होती.

आता सिरम कंपनीकडून पुण्यात खासगी रुग्णालयांनी लस खरेदी केली आहे. आज महापालिकेला कोव्हिशील्डचे 13 हजार डोस मिळाल्याने 70 केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस दिले जात आहेत.

Please follow and like us: